खून प्रकरणातील फरार आरोपीस पूण्यातून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:27+5:302021-06-09T04:37:27+5:30
हिंगोली तालुक्यातील पारडा येथे २००७ मध्ये खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी ...
हिंगोली तालुक्यातील पारडा येथे २००७ मध्ये खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी बबन उर्फ उत्तम केशवराव मस्के (रा. पारडा) यास अप्पर सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून आरोपी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१३ मध्ये तो पॅरोर रजेवर बाहेर आला. रजा संपल्यानंतरही तो कारागृहात परत न जाता फरार झाला. दरम्यान, खूनाच्या गुन्ह्यातील इतर आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात फौजदारी अपील दाखल केला होता. सदर निकाल खारीज झाल्याने हिंगोली अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.
एकीकडे हिंगोली पोलीस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पुणे, नाशिक परिसरात ओळख लपवून राहत होता. सलग आठ वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर तो पूणे परिसरात असल्याची माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि. उदय खंडेराय, बासंबा ठाण्याचे सपोनि राजेश मलपिलू, सपोउपनि पवार, पोह वाळे, स्थागुशाचे पोना किशोर कातकडे, पोशि विठ्ठल काळे, सायबर सेलचे सुमित टाले यांचे पथक दोन दिवसांपासून त्याच्या मागावर होते. अखेर तो पुणे ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आळे फाटा परिसरात पोलिसांच्या जाळ्यात फसला. तब्बल आठ वर्षानंतर फरार आरोपी बबन उर्फ उत्तम केशवराव मस्के यास अटक करण्यात पोलिसांना यश आले. यासाठी नाशिक पोलीस ठाण्याचे पोनि शिंदे व पुणे ग्रामीणचे मधूकर पवार व त्यांच्या पथकाने मदत केली.
फोटो क्र- ०८