रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह तिघांना एसीबीने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:34 PM2022-07-15T20:34:06+5:302022-07-15T20:49:12+5:30
रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाच्या पाच टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे केली होती.
कळमनुरी (जि.हिंगोली) : नगरपालिका हद्दीत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना कळमनुरी न.प.चे मुख्याधिकारी उमेश कोठीकरसह अन्य दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ जुलै रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास रंगेहाथ पकडले. दरम्यान न. प. कार्यालयातच तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारली.
रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाच्या पाच टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी न.प.च्या मुख्याधिकारी कोठेकरने तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागहिंगोली यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ जुलै रोजी पडताळणी केली. या पडताळणीत तथ्य आढळून आल्याने १५ जुलै रोजी सापळा रचून नगरपालिका कार्यालयात चाळीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याधिकाऱ्यांना पकडण्यात आले.
लाचेच्या या सापळ्यात नगरपालिकेचे कर्मचारी जाकेर हुसेन, राहुल जाधव यांचाही समावेश असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उमेश कोठीकर यांच्यासह जाकेर अहमद ,राहुल जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही पोलीस उपआधीक्षक नीलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विजय पवार, पोहेका विजय उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, शेख युनूस, हिम्मतराव सरनाईक आदींच्या पथकाने केली.