पाच हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:29 PM2019-06-04T16:29:25+5:302019-06-04T16:30:34+5:30
पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
हिंगोली : जि. प. शिक्षणच्या समग्र शिक्षा अभियान विभागातील कार्यकारी अभियंत्यास पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई पथकाने ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केली.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेतील समग्र शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता विजय अग्रवाल यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. शाळेचे केलेले बांधकाम पुस्तीकेचे मोजमाप करून देण्यासाठी अभियंता अग्रवाल यांनी पैशाची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार मंगळवारी जि. प. च्या समग्र शिक्षा अभियान कक्षात जाऊन तक्रारीची पडताळणी केली असता अभियंता विजय अग्रवाल हे तक्रारदाराकडून पाच हजार रूपये स्वीकारत असल्याचे आढळुन आले. पथकाने धडक कारवाई करून अग्रवाल यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.