हृदयद्रावक! रुग्णालयात जाताना काळाने गाठले; आजारी आई, वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू
By रमेश वाबळे | Published: January 11, 2024 12:32 PM2024-01-11T12:32:56+5:302024-01-11T12:34:28+5:30
आईला रुग्णालयात नेताना दुचाकी खड्ड्यात कोसळली; आजारी आई, वडिलांसह मुलाचा मृत्यू
हिंगोली : आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना सिरसम बु. ते डिग्रसवाणी रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीला बुधवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील वडील, मुलगा आणि आई या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथील कलाबाई कुंडलीक जाधव (वय ६०) यांची तब्येत ठिक नव्हती. १० जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजता पती कुंडलीक श्रीपती जाधव (वय ६५) व मुलगा आकाश कुंडलीक जाधव (वय ३०) हे कलाबाई यांना एम.एच.२० एझेड ५७१७ या दुचाकीद्वारे सिरसम बु.येथील रूग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. डिग्रसवाणी ते सिरसम बु.दरम्याच्या वळणावर दुचाकीला अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
ही घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर बासंबा ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. अपघातप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया बासंबा पोलिस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच जाधव कुटुंबातील तिघांना काळाने गाठल्याने डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे.