पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी १२ तासानंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:25 PM2019-08-19T13:25:52+5:302019-08-19T13:28:25+5:30
सेनगाव न्यायालयातून आ. बाळापुर येथे नेत असताना मोरवाडीजवळुन हा आरोपी पळाला होता.
हिंगोली : तब्बल २६ दुचाकी चोरीच्या प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी सोमवारी (दि.१९) सकाळी १० वाजता कळमनुरी शिवारातील खोरी येथे जेरबंद केले. तब्बल १२ तासाच्या प्रयत्नातून आरोपी देवीदास बाबूराव कांबळे (३०) पोलिसांनी जेरबंद केल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. कांबळेवर बाळापूर पोलीस ठाण्यातही गुन्ह्याची नोंद आहे. यापूर्वीही त्याच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सेनगाव न्यायालयातून आ. बाळापुर येथे नेत असताना मोरवाडीजवळुन हा आरोपी पळाला होता.
दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी नांदेड येथे मुसक्या आवळल्या होत्या. कांबळे हा चोरीच्या दुचाकी हिंगोली जिल्ह्यात विक्री करत असल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली होती. त्यानंतर चोरीच्या एका दुचाकीसह देविदास कांबळे यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडील १४ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या एकूण २६ दुचाकी जप्त केल्या होत्या. हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या अनेक दुचाकी त्याच्याकडे सापडल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याच्या प्रकरणात देवीदास कांबळे फरार होता. अखेर पोलिसांना चकमा देवुन पळून गेलेला दुचाकी चोरीच्या घटनेतील आरोपी देविदास कांबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.