पुजाऱ्यास लुटून आरोपींची गुवाहाटी सफर; सरपंचाच्या मुलासह पाचजण जेरबंद
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: February 4, 2023 07:08 PM2023-02-04T19:08:16+5:302023-02-04T19:08:39+5:30
पिस्टलचा धाक दाखवून पुजाऱ्यास लुटणारे पाच आरोपी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली : येथील खडेश्वर बाबा आश्रमातील पुजाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावून ऐवज लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिस्टल, जिवंत काडतूस, सोन्याचे दागिणे असा एकूण ३ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली शहराजवळील चिखलवाडी भागातील खडेश्वर बाबा आश्रमातील सुमेरपुरी शंभुपुरी महाराज या पुजाऱ्याच्या डोक्याला पिस्टल लावून दरोडेखोरांनी सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज लुटला होता. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार संभाजी लेकूळे, भगवान आडे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, प्रशात वाघमारे, शेख जावेद, प्रमोद थोरात, रोहित मुदीराज, दिपक पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
त्यानुसार या घटनेत ओमसाई शिवाजी खरात, प्रदिप उत्तमराव गायकवाड (दोघे रा. गंगानगर हिंगोली), कैलास शिवराम देवकर (रा. गांधीनगर गोरेगाव), अंकुश जालिंदर गायकवाड (रा. इंदिरानगर हिंगोली), राहूल विठ्ठल धनवट (रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा) यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पाचही जणांना ताब्यात घेत विचारपूस केली. तेव्हा या घटनेत सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्टल, तीन जीवंत काडतूस, सोन्याचे दागिणे, दोन दुचाकी, मोबाईल असा एकूण ३ लाख २४ हजारांचा मुद्देूमाल जप्त केला.
दोघे पोहचले गुवाहटीला; विमानाने परतले
पुजाऱ्यास लुटल्यानंतर यातील ओमसाई खरात व प्रदिप गायकवाड या दोन आरोपीस एका शेतातून ताब्यात घेतले. तर कैलास देवकर व अंकुश गायकवाड हे दोघे गुवाहटीला पळून गेले होते. तर राहूल धनवट पुण्यात लपून बसला होता. दोघे गुवाहटीला असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून विमानाने परत येण्याचे आवाहन केले. त्यानुसार दोघेजण थेट विमानाने नागपूरपर्यंत व पुढे वाहनाने हिंगोलीत परतले.
एकजण निघाला सरपंचाचा मुलगा
यातील एका आरोपीची आई सरपंच तर वडील सेवानिवृत्त ग्रामसेवक असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक वर्षापूवी ओमसाई यास विशाल सांगळे (रा. वंजारवाडा) याने पिस्टल दिले होते.
वर्षभरात तीन दरोड्याचा उलगडा
येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाला वर्षभरात तीन दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे. या पथकाने सुराणा नगर, बियाणी नगर, तसेच उमरा फाटा येथील दरोडा प्रकरणातील आरोपीस जेरबंद केले आहे.