चार महिन्यांमध्ये १३१ दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:32+5:302021-06-01T04:22:32+5:30
हिंगोली : फेब्रुवारी (२०२१) महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने संचारबंदीसह टाळेबंदी ...
हिंगोली : फेब्रुवारी (२०२१) महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने संचारबंदीसह टाळेबंदी लागू केली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासन संचारबंदी कडकपणे राबवित आहे; परंतु काही जण मात्र संचारबंदीचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. यादरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० फेब्रुवारी ते २८ मे या चार महिन्यांमध्ये १३१ छोट्या- मोठ्या दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार १०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले आहेत.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून विनामास्क फिरणाऱ्यांना तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना दंड लावण्यात यावा, अशी सूचना शासनाने केली. दंड लावल्यास फिरणे बंद होऊन बाजारातील गर्दी कमी होईल, असे शासनाला वाटत आहे. ही जबाबदारी शासनाने नगरपरिषद तसेच पोलीस विभागावर सोपविली आहे. २० फेब्रुवारीपासून २८ मेपर्यंत १३१ दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामध्ये क्लब व मंगल कार्यालय ४, रेस्टॉरंट/ शॉपिंग मॉल १३० व इतर १० दुकाने अशा मिळून १३१ दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापोटी २ लाख ८५ हजार १०० रुपये वसूल करण्यात आले. त्याचबरोबर या चार महिन्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी ९४० जण विनामास्क आढळून आले. यापैकी ७८० जणांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापोटी १ लाख ५७ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
तरीही फिरणे थांबेना ...
कोरोना महामारीचे रुग्ण वाढत असतानाही काही जण मात्र विनाकारण आणि विनामास्क बाजारात फिरताना आढळून येत आहेत. दंड भरावा लागला तरी चालेल पण फिरणे आम्ही बंद करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे २० फेब्रुवारी ते २८ मे या चार महिन्यांमध्ये मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १३१ छोट्या-मोठ्या दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच सुरू आहे. विनाकारण आणि विनामास्क नागरिकांनी बाजारात फिरू नये.
- श्याम माळवटकर,न.प. प्रशासकीय अधिकारी