सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:27 PM2019-05-06T15:27:29+5:302019-05-06T15:29:11+5:30
येथील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणावर असलेल्या तीन गेटवरून अवैध पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
धरणातून पाणी उपसा करू नये, असे वारंवार सांगूनही शेतकरी ऐकत नसल्याने ढेगज शिवार, वडचुना व दुरचुना येथील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सिद्धेश्वर तलावातून अवैधरीत्या पाणी उपसा करणारे पंपसेट व साहित्यांचे कनेक्शन तोडल्याची कार्यवाही अवैध पाणी उपसा प्रतिबंध पथकाचे प्रमुख तथा औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व कनिष्ठ अभियंता अंकित तिवारी यांनी केली. तीन गेट परिसरातील ढेगज शिवार, वडचुना व दूरचुना तलाव क्षेत्रातील अवैध मोटारीची पाहणी केली असता यावेळी त्यांना कनेक्शन दिसून आले.
मात्र सदरील शेतकऱ्यांनी त्यांचे केबल व स्टार्टर जवळपास बऱ्याच जणांनी कनेक्शन कट होण्याचा अंदाज येताच ते घेवून गेले. तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे सिद्धेश्वर तीन गेटजवळील १६ (एक डीपी), ढेगज शिवरातील ८० (दहा डीपी) व वडचुना शिवारातील ७५ (दहा डीपी), दुरचूना शिवारातील ४० (६ डीपी) एकूण २११ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळेपर्यंत सुरू करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
धरणात मृत साठा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अंकित तिवारी, महावितरणचे अभियंता जैन, ए.आर. मेश्राम यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे. सिद्धेश्वर धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यात आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी वसमत व तहसीलदार औंढा नागनाथ यांनी दिले होते.