सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या चार ‘मुन्नाभाई एमबीबीएस’वर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:31+5:302021-06-30T04:19:31+5:30
हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील दोन तालुक्यांत चार मुन्नाभाई एमबीबीएस व चार दवाखान्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून कागदपत्रे हस्तगत ...
हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील दोन तालुक्यांत चार मुन्नाभाई एमबीबीएस व चार दवाखान्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून कागदपत्रे हस्तगत केली. यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात सर्वच नागरिक त्रस्त झाले होते. या दरम्यान ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या बोगस डॉक्टरांचा व्यवसाय चांगलाच चालू होता. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार आल्यानंतर आरोग्य विभागाने त्याची शहानिशा केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे या संबंधीचा अहवाल पाठविला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अहवाल पाहिल्यानंतर वसमत येथील दोन बोगस डॉक्टर व त्यांचे दवाखाने आणि औंढा येथील दोन बोगस डॉक्टर व त्यांच्या दवाखान्यांची तपासणी करत फौजदारी गुन्हे दाखल केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टर आढळून आल्यास ग्रामपंचायतमार्फत त्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्यानंतर तालुकास्तरीय समिती सदरील अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे पाठविते. जिल्हास्तरीय समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करून मेडिकल कौन्सिलकडे अहवाल देते. यानंतर तेथे कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अहवाल परत जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो. यानंतर जिल्हाधिकारी या बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची सर्व प्रमाणपत्रे ताब्यात घेतात.
जिल्ह्यात एकूण बोगस डॉक्टरांवर कारवाई -४
विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई-४
तालुकानिहाय बोगस डॉक्टर्स
औंढा २, वसमत २, हिंगोली ०, कळमनुरी ०, सेनगाव ०
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
बोगस पदवी घेऊन सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारे डॉक्टर हे गतवर्षी आढळून आले. खरे पाहिले तर या बोगस डॉक्टरांना नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा काही एक अधिकार नाही. बहुतांश वेळा खेड्यातील नागरिक हे या बोगस डॉक्टरांचे बळी ठरतात. आम्ही डॉक्टर आहेत, असे भासवून दवाखानाही थाटतात.
ग्रामीण भाग असो की शहरी भाग, नागरिकांनी बोगस डॉक्टरांपासून नेहमीच सावध राहिले पाहिले. बोगस डॉक्टर असल्याची माहिती कळाल्यानंतर लगेच संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेशी संपर्क साधावा. तसेच आरोग्य विभागालाही बोगस डॉक्टरांबाबत माहिती द्यावी. म्हणजे हे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जिवाशी खेळणार नाहीत. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा त्यांना अधिकार कोणीही दिलेला नाही.
तक्रार आली तर कारवाई...
ग्रामपंचायत अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे देते, गटविकास अधिकारी अहवाल तालुकास्तरीय समितीकडे देते. त्यानंतर तालुकास्तरीय समिती अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे देते. यानंतर जिल्हास्तरीय समिती मेडिकल कौन्सिलकडे अहवाल पाठविते. यानंतर मेडिकल कौन्सिलचा अहवाल परत जिल्हास्तरीय समितीकडे येतो. यानंतर जिल्हाधिकारी बोगस डॉक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल करते.
नागरिकांनी सतर्क रहावे...
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हे बोगस डॉक्टर जास्त प्रमाणात वावरत असतात. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहून नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. म्हणजे या बोगस डॉक्टरांवर व त्यांच्या दवाखान्यावर रितसरपणे कारवाई करता येईल.
- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली