जिल्हाभरात अवैध दारू विक्रेते, मटका जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:51+5:302021-07-30T04:31:51+5:30
२९ जुलै रोजी कळमनुरी शहराजवळ एका अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्याच्याकडून ४ हजार २०० रुपयांची ...
२९ जुलै रोजी कळमनुरी शहराजवळ एका अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्याच्याकडून ४ हजार २०० रुपयांची दारू तसेच २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पो.शि. सूर्यकांत भारशंकर यांच्या फिर्यादीवरून राधेश्याम दत्तराव इंगोले (रा. कळमकोंडा) याच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
औंढा तालुक्यातील नागेशवाडी ते हट्टा रोडवरील असोला पाटी परिसरात एकाकडून ३ हजार ४८० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप थडवे यांच्या फिर्यादीवरून दत्ता सीताराम घुगे या धाबा मालकावर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ही कारवाई सेनगाव तालुक्यातील मन्नान पिंपरी येथे २८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. मन्नान पिंपरी येथे मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ७ हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या फिर्यादीवरून गजानन दत्तराव सोनोने (रा. मन्नान पिंपरी), विनोद अण्णा (रा. रिसोड) या दोघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोघे कल्याण नावाचा मटका जुगार खेळवीत होते.तसेच येथे एका दारू विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पो.ना. गजानन पवार यांच्या फिर्यादीवरून विक्रम तुळशीराम मोरे (रा. मन्नान पिंपरी) याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या ४ हजार २० रुपये किमतीच्या बॉटल जप्त केल्या.
- वसमत तालुक्यातील आसेगाव येथे एका किराणा दुकानातून १ हजार ६२० रुपये किमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी पो.ह. भूजंग कोकरे यांच्या फिर्यादीवरून कैलास रंगराव मुळे याच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
- कळमनुरी तालुक्यातील उमरा पाटीजवळ पोलिसांनी एकाकडून ५ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बॉटल तसेच एक दुचाकी जप्त केली. या प्रकरणी पो.हे.कॉ. रोहिदास राठोड यांच्या फिर्यादीवरून अरविंद सखाराम मगर (रा. सिंदगी) याच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
फाेटाे नं. ०७