वाहनचालकांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:49+5:302021-01-08T05:36:49+5:30
दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई हिंगोली : जिल्ह्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध सर्व पाेलीस ठाण्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. ...
दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई
हिंगोली : जिल्ह्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध सर्व पाेलीस ठाण्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत दारूविक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
४ जानेवारी रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका ठिकाणी छापा मारण्यात आला. आरोपीकडून ९.७२ लीटर दारू अशी एकूण ७ हजार ८६० रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. आराेपीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पिकांना थंडी पोषक
हिंगोली : जिल्ह्यात दाेन ते तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची उगवण चांगली असून शेतकरी आनंदीत असल्याचे दिसून येत आहे.
खंडित वीज पुरवठ्यास शेतकरी वैतागले
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावसह परिसरात विजेचा लपंडाव वाढला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने रब्बी हंगाम चांगला आहे. पिकांची उगवण चांगली आहे. विहिरींना पाणीही भरपूर प्रमाणात आहे; परंतु मागील १५-२० दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बागायती पिकांसह कोरडवाहू पिकांनाही पाणी देणे शक्य होत आहे. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू
हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. यात काही बिनविरोधही झाले आहे. सध्या काही गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळत आहे. माजी आमदार, विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावातील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.
बसस्थानकातील गिट्टी उखडली
हिंगोली : शहरातील नव्या बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. प्रवाशांना धुळीतच बसून बसची वाट पहावी लागत आहे. संबंधित विभागाने या बाबीचे दखल घेऊन प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
गुंडा पाटी ते करंजी रस्त्याची दुरवस्था
करंजी : वसमत तालुक्यातील गुंडा पाटी ते करंजी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा पाच किलोमीटर रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून उखडला असून, जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडले आहे. साधी सायकलसुद्धा या रस्त्यावरून चालवता येत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेेऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
पीक विमा वितरित करण्याची मागणी
हिंगोली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने साेयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे आतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांकडे ॲड्राइड माेबाइल नसल्याने विमा कंपनीकडे ते तक्रार करू शकत नाही. यामुळे विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांवर अन्यायच होत आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.