मुख्यालयी गैरहजर राहिल्यास कारवाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:11 PM2019-09-15T23:11:44+5:302019-09-15T23:11:59+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग, असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान राबविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग, असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी भेटी घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच अधिकारी गैरहजर आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा डॉ. पवार यांनी दिला.
विशेष म्हणजे काही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत सदर अभियानाबाबत मार्गदर्शन केले होते. शिवाय १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्या येणाºया या अभियानसंदर्भात आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. परंतु अनेक ठिकाणी याकामी दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी पिंपळदरी, लोहरा, शिरडशहापूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध व जनजागृती अभियान याबाबतचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी २४ तास हजर राहावे व ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सक्त सूचना दिल्या. जर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी गैरहजर आढळून आल्यास कोणाचीही गय केली जाणार नसून त्याच्याविरूद्ध कडक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोहरा येथील निवासस्थानाची व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक साहेबराव नरोटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.