दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:23 AM2018-03-20T00:23:28+5:302018-03-20T11:31:30+5:30
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
मागील महिनाभरापासून जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा केवळ शोधच घेतला जात आहे. दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांत तपास सुरू आहे, असेच ऐकायला मिळते. वाहने चोरीस गेल्या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल आहेत.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत असल्या तरी ही चोरट्यांची टोळी बाहेरीलच आहे, असे म्हणता येणार नाही. वाहन चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. नागरिकांनीही दक्ष रहावे, असे आवाहन अ.पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी केले.
हिंगोलीतून बनावट चावीने दुचाकी क्रमांक (एमएच-३८-के - ७८२७) पळवून नेल्याची घटना १४ मार्चला घडली. तसेच वसमत शहरातील सोमवार पेठ येथून घरासमोरील दुचाकी लंपास झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. वाईपाटी येथूनही बनावट चावीने वाहन पळविले होते.