मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:04 AM2018-11-21T01:04:40+5:302018-11-21T01:06:26+5:30
२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.
हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच राज्य सरकारकडे मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, ईएसबीसी ही आरक्षणाची पद्धत नसून ही केवळ सवलत आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा मराठा समाजाचा लढा सुरूच राहील. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरात ५८ च्यावर मोर्चे काढण्यात आले आहेत. अखेर शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती पाहण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वे केला. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अहवालही आयोगाने राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच ईएसबीसी हा आरक्षणाचा प्रवर्ग नसून ती केवळ एक सवलत आहे, अशीही चर्चा या बैठकीत झाली. तसेच राज्यभरात मराठा जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर, सर्कलनिहाय यासंदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील मराठा समाजातील हजारो बांधवांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.