पोलीस भरती घोटाळा प्रकरणी सेवानिवृत्त समादेशक नामदेव मिठ्ठेवाड अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:52 PM2018-11-22T21:52:57+5:302018-11-22T21:53:47+5:30
मिठ्ठेवाड यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
हिंगोली : राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक आणि हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्र. १२ च्या पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर ११ मे २०१८ रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम पुष्ठपाटे, सूत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीचे ऑपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा आणि गुण वाढवून नोकरी मिळविणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदणे यांच्या पथकाकडे होता.
२०१३ साली ४, २०१४ मध्ये १०, तर २०१७ मध्ये ६, अशा एकूण २० जणांचे गुण वाढवून त्यांची एसआरपीएफमध्ये भरती केल्याचा आरोप होता. दरम्यान, तपास अधिकारी राहुल मदने यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक व माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना आज बोलावले होते. अर्थपूर्ण देवाणघेवाणीतूनच ही भरती झाल्याचे चौकशीत समोर आले. उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर मदने यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. यानंतर सायंकाळी ५ वाजता हिंगोली येथील न्यायालयासमोर मिठ्ठेवाड यांना हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले. यात आरोपींची संख्या जवळपास तीसच्या घरात गेली आहे. मिठ्ठेवाड यांना अटक होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आज अटकेची कारवाई करताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.