प्रशासनही हलेना अन् धरणे आंदोलकही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:28 AM2018-03-16T00:28:50+5:302018-03-16T00:28:54+5:30
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी मग्रारोहयोची कामे सुरू करा तसेच यापूर्वी मागणी करूनही काम न दिल्याने बेरोजगारी भत्ता द्या या मागणीसाठीचे धरणे अजूनही सुरूच ठेवले आहे. प्रशासन केवळ चर्चा करीत असून मागणी मान्यच करायला तयार नसल्याने गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी मग्रारोहयोची कामे सुरू करा तसेच यापूर्वी मागणी करूनही काम न दिल्याने बेरोजगारी भत्ता द्या या मागणीसाठीचे धरणे अजूनही सुरूच ठेवले आहे. प्रशासन केवळ चर्चा करीत असून मागणी मान्यच करायला तयार नसल्याने गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून धानोरा येथील जवळपास १५ ते २0 मजूर कुटुंबियांसह धरणे आंदोलन करीत आहेत. दिवसभर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यास विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते येतात. अधून-मधून प्रशासनाचे अधिकारीही त्यांना धरणे मागे घेण्याची विनंती करतात. मात्र बेरोजगारी भत्ता मंजूर झाल्याशिवाय मागे हटायचेच नाही, असा त्यांचा निश्चय दिसू लागला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांकडे कामाची मागणी मजुरांनी केली होती. त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. ग्रा.पं.ने त्याची दखल घेतली की नाही, हा प्रश्नच आहे. मात्र या मजुरांना त्यावेळी काम मिळाले नाही. त्यामुळे मग्रारोहयोच्या नियमावर बोट ठेवून प्रशासनास कोंडीत पकडले आहे. तर अधिकारी त्यांना दाद द्यायला तयार नाहीत. नवा पायंडा निर्माण होण्याच्या भीतीने या मजुरांचे कामाचे दिवस अजूनही वाया घातले जात आहेत. यात जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून दप्तरदिरंगाई करणाºयांवरही बडगा उगारण्याची गरज आहे. अन्यथा मजुरांना काम न देण्याचा पायंडाही पडण्याची भीती आहे.