वगरवाडी गावात डेंग्यूने तिघांचा मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:00 AM2017-12-23T00:00:49+5:302017-12-23T00:01:00+5:30
तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.
वगरवाडी हे गाव शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तिघांचा बळी गेल्याच्या प्रकारामुळे या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. गावात प्रवेश करताच रस्त्याचे रूपांतर गटारगंगेत झाल्याचे दिसून येत होते. नाल्या तुंबल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव असून हीच बाब आजाराला निमत्रंण देत असल्याचे दिसले. कैलास नरुके यांच्या घरानजीक तर घाणीचा कहर आहे. यात त्यांचे कुटुंबच आजारी पडले आहे. राम कैलास नरूके (१४) हाही तापाने फणफणला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच स्वाती कैलास नरूके (११) ही आजारी पडली. २४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या घरी भेट दिली असता कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या लेकराला ताप आला होता, यानंतर औंढा येथे खासगी रूग्णालयात दाखविले; परंतु ताप कमी होत नसल्याने हिंगोलीला नेले; परंतु त्यांनीही नांदेडला पाठवल्याने या पाच ते सहा दिवसात ताप जास्त होवून डेंग्यूने आमच्या लेकरांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर शशिकला गुणाजी कच्छवे यांचाही ११ नोव्हेंबर रोजी ताप वाढल्याने म्हणजे डेंग्यूनेच झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांंच्या घरालादेखील सांडपाणी, नालीचे दूषित पाण्याने वेढा दिला आहे. मात्र आता पुन्हा गावात तापाची साथ सुरू झाली अन् तपासणीअंती आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी डेंग्यूने गावातील लोकांचा बळी जात असल्याची ओरड सुरू केली. तेव्हा आरोग्य विभाग जागा झाला.
आरोग्य पथक घरोघरी भेटी देवून पाणी साठलेले रांजण, टाक्या रिकाम्या करायला लावत आहे; परंतु या पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे उपचारानंतर निष्पन्न झाले.
आरोग्य विभागाचे कोणीच फिरकत नाही?
शिरडशहापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडलेले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे विनोद अतुरकर असून, गावात आरोग्य सेविका पी.आर. धात्रक, ए.बी. जोगदंड आहेत; मात्र हे कर्मचारी कधीच गावात फिरुन त्यांनी जनजागृती केल्याचे पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्या तिघांच्या मृत्युमुळे आरोग्य विभाग जागा झाला आहे, असे ग्रामस्थ सांगत होते.