‘आरटीई’अंतर्गत ४७४ जणांचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:08 PM2019-09-15T23:08:22+5:302019-09-15T23:08:44+5:30
आरटीई २५ टक्केअंतर्गत जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आरटीई २५ टक्केअंतर्गत जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आता ११ ते २१ सप्टेंबर २०१९ पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे १२६५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ४७४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत, तर उर्वरित २३६ पालकांनी आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेशासाठी चौथी विशेष फेरी सोडतीनंतर पालकांनी शाळेत जाऊन पाल्यांचे प्रवेश निश्चत करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. शिवाय याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. आरटीई २५ टक्केअंतर्गत ९ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय चौथी लॉटरी काढण्यात आली आहे. राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना १० सप्टेंबर २०१९ पासून एसएमएस पाठविण्यात आले आहेत. परंतु ज्या पालकांना एसएमएस न मिळाल्यास वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे तपासावे लागणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून पाठविल्या जाणाºया एसएमएसवर अवलंबून राहू नये. ११ सप्टेंबरपासून २१ सप्टेंबर २०१९ पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एसएमएस न मिळाल्यास संबधित वेबसाईट वर जाऊन अप्लीकेशनवाईज डिटेल्स्मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का, ते पाहावे.
पडताळणी समितीस कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून दररोज नोंदविलेले प्रवेश आॅनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अन्यथा कार्यालयीन कारवाईचा इशारा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीप सोनटक्के यांनी दिला आहे.