५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:08 AM2018-07-20T00:08:55+5:302018-07-20T00:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यात सर्वच खाजगी इंग्रजी शाळांना २५ टक्के मोफत विद्यार्थी प्रवेशाची सक्ती आहे. मात्र यात १७ शाळांनी ५९ विद्यार्थ्यांना अजून प्रवेश दिला की नाही? याचाच संभ्रम कायम आहे. तसा अहवाल आॅनलाईन अथवा शिक्षण विभागाकडेही दिला नसल्याने यावरून बोंब सुरू आहे.
मागील वर्षीपर्यंत शासनाकडून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशासाठी शिक्षण संस्था नाक मुरडत होत्या. शासनाकडून या विद्यार्थ्यांचे परतावा शुल्क वेळेत मिळत नसल्याने हा प्रकार घडत होता. दरम्यान काही संस्थांनी ही रखडलेली रक्कम मिळाल्याशिवाय यंदा प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर यात परताव्याची रक्कम शाळांना अदा करण्यास प्रारंभ झाला. टप्पे पाडून ही रक्कम दिली जात आहे. मात्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही ५९ विद्यार्थ्यांना १७ शाळांमध्ये प्रवेश मिळाला की नाही, याची माहितीच उपलब्ध नाही.
यामध्ये खाकीबाबा हिंगोली-२, स्वीस अॅकेडमी खटकाळी-१, लक्ष्मीबाई घुगे शाळा गंगानगर-४, अन्नपूर्णा स्कॉलर्स-५, शाहू महाराज इं.स्कू. कनेरगाव नाका-२, जेट किडस् हिंगोली-४, म.गांधी मेमोरियल पुसेगाव-१, कै.प्रभावती जैन शाळा वसमत-३, अहिल्यादेवी होळकर शाळा वसमत-१, लालबहादूर शास्त्री शाळा वसमत-८, लालबहादूर शास्त्री शाळा वसमतनगर-७, पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूल-१, गायत्री शाळा पिंपळा चौरे-१, डायमंड औंढा-२, एमआयपी सेमी जवळा बाजार २, स्वामी विवेकानंद आजरसोंडा-१४ तर रेसन्स शिरडशहापूर येथील एका प्रवेशाचा प्रश्न आहे. यात प्रवेश झाला, नाकारला की मुलगाच शाळेत आला नाही, याची कोणतीच माहिती मुख्याध्यापकांनी दिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे.
दुसऱ्या फेरीतील या प्रवेशांबाबत शाळा अजूनही माहिती द्यायला तयार नाहीत. १९ जुलै ही अशी माहिती देण्याची अंतिम तारीख होती. मात्र या तारखेपर्यंत १७ शाळांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. तर या शाळांवर आता कारवाई प्रस्तावित करण्यात येणार
असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती प्रलंबित असल्याने प्रवेशाची पुढील फेरी घेणे शक्य होत नाही. यातच बराच काळ निघून गेल्याने पुढील फेºयांचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. तर प्रशासनही ही बाब फारसी गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते.
६९७ पैकी २९२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचाच अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. अजून ४0५ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे. पुढील फेºयांत ते होतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला.