१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:23 AM2018-08-22T00:23:04+5:302018-08-22T00:23:09+5:30
मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.
कयाधू नदीला पूर आल्याने सोडेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सोडेगाव, नांदापूर, असोला, बोल्डा, बोल्डावाडी, करवाडी, हरवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. २० आॅगस्टच्या मध्यरात्रीपासूनच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर कोंढूर, डोंगरगाव पूल, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव या गावाला पुराचे पाणी भिडले आहे. कयाधू नदीवर सावंगी (भू), चाफनाथ, सोडेगाव, सालेगाव, नांदापूर, डिग्रस कोंढूर, कसबे धावंडा, येगाव, चिखली, शेवाळा, येलकी, पिंपरी बु., सावळी, डोंगरगाव पुल आदी १४ गावे वसलेली आहे. या नदीला पुर आल्याने पुराचे पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत.
ही पिके हातची गेली असून शेतकरी पिकांना पाण्याखाली पाहून हतबल झाला आहे. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी कोंढूर, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव आदी गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.
कयाधू नदीच्या काठावरील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २१ आॅगस्ट रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते. शाळेतही विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावलेली होती तर शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. विहिरी, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत.
जिल्ह्यात मंडळनिहाय पर्जन्यमान असे हिंगोली-८१, खांबाळा-६५, माळहिवरा-७८, सिरसम बु.-७७, बासंबा ८२, नर्सी ना.-४८, डिग्रस -३७, कळमनुरी-९0, नांदापूर-९५, आखाडा बाळापूर-७५, डोंगरकडा-५८, वारंगा फाटा-६१, वाकोडी-१८, सेनगाव-४0, गोरेगाव-५0, आजेगाव-५५, साखरा-१२,
पानकनेरगाव-४५, हत्ता-४८, वसमत-३२, हट्टा-६१, गिरगाव-३७, कुरुंदा-६0, टेंभूर्णी-३५, आंबा-६0, हयातनगर-७४, औंढा ना.-८७, जवळा बा.-७९, येहळेगाव-९३, साळणा-७७ मिमी. जिल्ह्याची एकूण सरासरी ६१.९६ मिमी आहे.
जिल्ह्याचे यंदाचे आतापर्यंतचे पर्जन्य ६४३.0६ मिमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पर्जन्य झाले. यात हिंगोली-७३.४0, वसमत-६३.८१, कळमनुरी-७७.२८, औंढा-८१.९0, सेनगाव-६४.८0 टक्के आहे.