...अखेर टपाल कार्यालयाचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:28 AM2018-05-18T00:28:32+5:302018-05-18T00:28:32+5:30
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली टपाल कार्यालयाचे कामकाज निवासस्थानातच सुरू होते. अखेर १७ मे रोजी टपाल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मात्र उदघाटन सोहळ्यात राजकीय मंडळी दिसून आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील अनेक वर्षांपासून हिंगोली टपाल कार्यालयाचे कामकाज निवासस्थानातच सुरू होते. अखेर १७ मे रोजी टपाल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मात्र उदघाटन सोहळ्यात राजकीय मंडळी दिसून आली नाही.
येथील नवीन टपाल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला होता. मात्र जलदगतीने बांधकाम करण्यात आलेल्या नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतराला मुहूर्त मिळत नव्हता. टपाल कार्यालयाची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना; आता टपाल कार्यालय नवीन इमारतीत थाटण्यात आले आहे. परभणी येथील डाक अधीक्षक आर. बी. रणाळकर यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोस्टमास्टर एस. एन. जगताप, डाक निरीक्षक शिनगे तसेच टपाल कार्यालयातील तायडे, मोरे व अधिकारी-कर्मचारी हजर होते. सुसज्ज इमारतीत कार्यालय हलविलण्यात आल्याने आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामे करताना येणाºया अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय नागरिकांना अत्याधुनिक सुविधेचा फायदा होणार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून नवीन इमारतीच्या उद्घाटनाची केवळ चर्चा ऐकवयास मिळत होती. परंतु वरिष्ठांचे याबाबत आदेश किंवा कुठलेही पत्र आले नसल्याचे टपाल कार्यालयाकडून सांगितले जात होते. शिवाय नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. परंतु आचारसंहितेमुळे राजकीय मंडळीची या ठिकाणी उपस्थिती दिसून आली नाही. अनेक वर्षांपासून टपाल विभागातील कर्मचारी जीर्ण झालेल्या निजामकालीन कार्यालयात कोंदट वातावरणात कामे करीत होते. निजामकालीन इमारतीतून कार्यालय निवास्थानात थाटण्यात आले. येथेही कामे करताना अडचणी व कर्मचाºयांची गैरसोय होत असे. उशिराने का होईना; टपाल कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळाली अन् नवीन इमारतीच्या बांधकामास प्रारंभ झाला. काही महिन्यांतच काम पूर्ण झाले आणि १७ मे रोजी उद्घाटनाला मुहूर्त मिळाला.