पोलिसांच्या आश्वासनानंतर शव घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:18 PM2018-07-08T23:18:09+5:302018-07-08T23:18:25+5:30
शॉक लागून मयत झालेले माधव चांदणे यांचे प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ८ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शॉक लागून मयत झालेले माधव चांदणे यांचे प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ८ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबधितांवर गुन्हा दाखल करा नंतरच प्रेत ताब्यात घेऊ असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
हिंगोली शहरातील नाईकनगर भागात विद्युत जोडणीचे काम करताना माधव विठ्ठल चांदणे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. परंतु संबधितांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही. असे नातेवाईकांनी सांगितले. यावेळी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करू, तसेच याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची पोलिसांत नोंद झाली आहे. घटनेची सखोल चौकशी करून तपासात जे काही निष्पन्न होईल त्या दिशेने शोध घेऊन दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल असे सपोनि गजानन कल्याणकर यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी चांदणे हे यांचे प्रेत ताब्यात घेतले.
चांदणे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळीही बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह खांबावरून खाली उतरविला होता.