दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:06 PM2019-05-10T12:06:42+5:302019-05-10T12:13:36+5:30
एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.
हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवार (दि.९ ) पासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी रात्री मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. गोशाळेत जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.
पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द, रामवाडी, उमरा या गावांना भेटी दिल्या. तसेच सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक या दुर्गम भागात जाऊन त्यांनी गोशाळेत मुक्काम केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा
भविष्यात चारा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील. काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये मागेल त्या गावाला टँकर तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेतकरी, पशुपालक व नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.