एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हांतर्गत बसेस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:29+5:302021-05-26T04:30:29+5:30
हिंगोली : तब्बल एक महिन्यापासून जिल्ह्यातील एसटी बसची सेवा पूर्णत: बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची ...
हिंगोली : तब्बल एक महिन्यापासून जिल्ह्यातील एसटी बसची सेवा पूर्णत: बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाला २५ एप्रिलपासून ते २४ मे पर्यंत जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील एसटी बसेस बंद ठेवण्याचे आदेशीत केले होते. त्याप्रमाणे एसटी महामंडळाने जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळत बससेवा पूर्णतः बंद ठेवली होती. दरम्यान, एसटी महामंडळाला उत्पन्न मिळावे यादृष्टीने मालवाहतूक सेवा चालू ठेवली होती. यातून महामंडळाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत दरम्यानच्या काळात एसटी आगारात यंत्र कारागीरव्यतिरिक्त २५ टक्के जवळपास कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. २४ मे रोजी जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाला जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यादरम्यान ज्या स्थानकांमध्ये कोरोना तपासणी होत नाही तेथे तपासणीची व्यवस्था करून घ्यावी, प्रवाशांना बसमध्ये चढतेवेळेस तपासणी केली असेल तरच बसमध्ये बसू द्यावे. नसता खाली उतरावे. एसटी चालक-वाहक यांनाही मास्क बंधनकारक करावा, आगारातून गाडी सोडते वेळेस गाडी स्वच्छ करून सोडावी, अशा सूचनाही महामंडळाला देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नियमांमध्ये जिल्हांतर्गत बसेस सुरू कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. प्रवासी संख्या जर जास्त मिळत असेल तर जिल्हाबाहेरही बसेस सोडाव्यात, पण कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे, असेही आदेशात म्हटले आहे.
कोरोनाचे नियम पाळले जातील....
जिल्हा प्रशासनाने आदेशीत केल्याप्रमाणे २५ मे रोजी हिंगोली ते वसमत, हिंगोली ते वारंगा या बसेस सोडण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन केले जाईल. एसटी वाहक, चालकाला मास्क हे बंधनकारक केले जाणार आहे. तसेच प्रवाशांनाही मास्कशिवाय बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ही खबरदारी महामंडळ घेणार आहे.
संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली.