'ओएलएक्स'वर जाहिरात पाहून आले, मालकाला धमकावून कारसह रोकड लुटून पसार झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:52 PM2024-07-03T18:52:40+5:302024-07-03T18:53:12+5:30
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने वसमत ते नांदेड मार्गावर आल्यानंतर दोघांनी कार मालकास धमकावले
- इस्माईल जहागीरदार
वसमत: 'ओएलएक्स'वर कार विक्रीची जाहिरातपाहून खरेदीसाठी आलेल्या दोघांनी टेस्ट ड्राइव्ह घेण्याच्या बहाण्याने मालकाला धमकावत कारसह रोकड, मोबाइल घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील हापसापुर येथिल लक्ष्मण सवंडकर यांनी त्यांच्या मालकीची कार ( क्र एम एच ३८ ऐडी ६५९५ ) विक्री करायची होती. यासाठी त्यांनी 'ओएलएक्स'वर कारची जाहिरात प्रसिद्ध केली. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान दोघांनी कार खरेदीची इच्छा असल्याचे सांगत माळवटा शिवार गाठले. सवंडकर यांच्यासोबत चर्चा करून गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊ असे म्हणाले. त्यानंतर सवंडकर यांना कारमध्ये बसवत दोघेही वसमत ते नांदेड मार्गावर आले.
दरम्यान, अचानक दोघांनी कार मालक सवंडकर यांना धाक दाखवत १५ हजार रोकड, मोबाईल काढून घेत कारसह पोबारा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार मालक सवंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि अनिल काचमांडे, जमादार अविनाश राठोड,अजय पंडित करत आहेत.