आठ दिवसांपासून हटवलेले अतिक्रमण ‘जैसे थे’; आता केली थेट जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:54 PM2022-02-02T17:54:52+5:302022-02-02T17:57:42+5:30
या परिसरात उभारण्यात आलेल्या ओट्यांवरून भाजी, फळे विक्री करण्याऐवजी मुख्य चौकात ठाण मांडले जात असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे.
हिंगोली : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागातील अतिक्रमण हटविण्याचा खेळ मागील आठ दिवसांपासून सुरूच आहे. ‘आधी हटले अन् पुन्हा थाटले’ अशी परिस्थिती चौथ्याच दिवशी अनुभवायला मिळाली. आज पुन्हा सर्वांचेच अतिक्रमण हटविले; मात्र ही परिस्थिती किती दिवस कायम राहील? हा प्रश्नच आहे.
हिंगोली नगरपालिका व पोलिसांच्यावतीने संयुक्तरित्या जुन्या नगरपालिका कार्यालयापासून या अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्यात खुराणा पेट्राेल पंप, जवाहर राेड, भाजी मंडई, इंदिरा गांधी पुतळा चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, पार्किंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळा चौक परिसर या ठिकाणापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत अनेकांचे हातगाडे जप्त करण्यात आले आहेत. वारंवार सांगूनही हातगाडेधारकांकडून याच भागात गाडे लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या परिसरात उभारण्यात आलेल्या ओट्यांवरून भाजी, फळे विक्री करण्याऐवजी मुख्य चौकात ठाण मांडले जात असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे.
मागील आठवड्यातच अशी कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. त्यामुळे आता थेट हातगाडे जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेचे बाळू बांगर म्हणाले की, यात जवळपास २५ ते ३० हातगाडे जप्त केले आहेत. ही माेहीम अजूनही सुरू आहे. या भागात पुन्हा अतिक्रमण करू नये, रस्ते मोकळे ठेवावेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्या पाळल्या गेल्या नाही, तर पुन्हा कारवाई करण्यात येईल.
पीपल्प बँक रोडचे काय?
पीपल्स बँकेकडून जि. प. शाळेकडे जाणारा रस्ता असो की, इंदिरा गांधी पुतळ्याकडे जाणारा रस्ता, या भागातही अतिक्रमणे वाढत आहेत. वाहतुकीचेही तीनतेरा वाजत आहेत. शिवाय या मार्गावर रस्त्यात हातगाडे, अवैध वाहतुकीची वाहने, अवैध गॅरेज, अवैध पार्किंगही आहे. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना पायी चालणे अवघड बनत आहे. मोंढा भागातील रस्त्यांवरही अतिक्रमण होऊ लागले आहे. पालिकेच्या पथकाने ठराविक भागाऐवजी शहरभर कारवाई करणे अपेक्षित आहे.