दूध दराबाबत 'स्वाभिमानी'चे आक्रमक आंदोलन; ट्रक जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:59 PM2020-07-20T18:59:15+5:302020-07-20T19:00:37+5:30
आंदोलकांनी वाहनाच्या चाकावर पेट्रोल टाकून ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली होती.
हिंगोली : हिंगोली - औंढा मुख्य रस्त्यावर येहळेगाव सोळंके शिवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी दुध घेऊन जाणारा ट्रक जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. आंदोलकांनी वाहनाच्या चाकावर पेट्रोल टाकून ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली होती.
दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २१ जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र २० जुलै रोजीच आंदोलन केले. हिंगोली-औंढा मुख्य रस्त्यावरील येहळेगाव सो. शिवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजहंस दूध असे नाव असलेला ट्रक अडविला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत वाहनाच्या टायरवर पेट्रोल ओतून ट्रक पेटवून दिला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती, मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालकही घाबरून गेले होते. नेमका काय प्रकार सुरू आहे? हे मात्र कोणालाच माहिती नव्हते. परंतु आंदोलकांनी दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केल्याने हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. मोजकेच कार्यकर्ते अन् त्यात ट्रकच्या चाकावर आणि रस्त्यावर पेट्रोल टाकून हे केवळ नाटकच सुरू आहे की काय? असा अंदाज प्रथम नागरिक लावत होते. याबाबत पोलिसांनाही काहीच माहिती नव्हती. परंतु काहीवेळाने पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झाली नव्हती.
राज्यातील दूध उत्पादक हा भूमिहिन शेतमजूर आहे. त्यातच टाळेबंदीमुळे दूध उत्पादकांचा रोजगारही गेला. अशा परिस्थितीत दुधाला उत्पादन खर्चापेक्षा दहा रुपये कमी किमतीत विक्री करावे लागत आहे. दहा रुपयांची प्रतिलिटर वाढ द्यावी. तर केंद्र शासनाने २३ जूनला १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान प्रतिकिलो ३० रूपये देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने २१ जुलै रोजी दूध बंद आंदोलन केले जाणार आहे, त्याच पार्श्वभूमिवर आंदोलकांनी हा ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला.