गरोदर मातांसाठी वातानुकूलित कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:00 AM2018-05-19T01:00:41+5:302018-05-19T01:00:41+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. आता गरोदर मातांना रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत बसण्याची वेळ तूर्तास टळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. आता गरोदर मातांना रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत बसण्याची वेळ तूर्तास टळणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाकाठी ३० ते ३५ महिलांची प्रसूती होते, तर तपासणीसाठी गरोदर मातांचीही संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी तपासणीस येणाऱ्या रुग्णांची गर्दी जास्त होत आहे. त्यामुळे गरोदर मातांना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. तर कित्येकदा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरही महिला प्रसूत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता या कक्षामुळे महिलांना अजिबात बाहेर बसण्याची वेळ नाही. यामध्ये जोखमीच्या व अतिजोखमीच्या गरोदर स्त्रियांसाठी प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात दाखल केल्यास किंवा गरोदरपणात त्यांना काही गुंतागुंत झालेली असल्यास, त्यांच्यासाठी हा स्वतंत्र वॉर्ड बनविण्यात आला आहे. यालाच ‘आॅबस्ट्रिक हाय डिपेडन्स वॉर्ड’ असे नाव दिलेले आहे. ज्या गरोदर स्त्रियांना रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय वारंवार गर्भपात, उंचि कमी असणे, गरोदरपणात झटके येणे, हृदय आजार असेल, अशा गरोदर स्त्रियांची विशेष देखभाल या कक्षात केली जाणार आहे. जेणेकरुन मातामृत्यू, बाल मृत्यूला आळा बसण्यास मदत होईल. या ठिकाणी एकूण ८ पलंग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उद्घाटनप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. पोहरे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. परदेसी, मेट्रन मीना मस्के, देशमुख, आर. के. जोशी, प्राचार्या गिरी, जया परदेशी, ज्योती पवार आदींची उपस्थिती होती.