रुग्णवाहिका न आल्याने मातेने ऑटोरिक्षात दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:51 AM2019-07-22T10:51:12+5:302019-07-22T10:56:17+5:30
ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कॉल करूनही वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे गरोदर मातेस प्रसूतीसाठी आॅटोने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु रुग्णालयाच्या पायऱ्या चढण्याच्या आतच ऑटोमध्येच गरोदर मातेने कन्यारत्नास जन्म दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
औंढा नागनाथ तालुक्यातील धार येथील गरोदर मातेस घरी प्रसूती कळा सुरू झाल्या. यावेळी नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून येण्याची विनंती केली. परंतु बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी अखेर गावातील आॅटोने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गरोदर माता व नातेवाईक हे आॅटोने औंढा येथील रुग्णालयाकडे निघाले. आॅटो रूग्णालय परिसरात पोहोचताच मातेने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. यावेळी परिचारिका रुपाली रासेकर व रुख्मिणी क्षीरसागर यांनी धाव घेऊन तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर यांना बोलावून घेतले. गरोदर माता व बालकावर प्रथम आॅटोतच उपचार केले. त्यानंतर दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. माता व मुलगी दोघेही ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णवाहिका नावालाच
औंढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शिरडहापूर, जवळा बाजार व औंढ्यासाठी ३ रुग्णवाहिका आहेत. यातील एक औंढ्यातील रुग्णवाहिका ही हिंगोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. औंढा हे तालुक्याचे ठिकाण असूनही रुग्णवाहिकेसाठी कॉल केल्यानंतर शिरडहापूर येथून रूग्णवाहिकेला औंढा येथे येण्यासाठी साधारणता ३० मिनिटे लागतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो.
......................