मागील कामाच्या चौकशीवरून ग्रामसभेत बाचाबाची, पोलिसांनी लाठीमारकरून गर्दीला पांगविले
By विजय पाटील | Published: August 24, 2023 06:25 PM2023-08-24T18:25:14+5:302023-08-24T18:27:04+5:30
ग्रामसभेत गोंधळ वाढल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले.
हिंगोली : मागील कामाचा हिशेब देण्यात यावा, केलेल्या कामाची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी विरोधकांनी ग्रामसभेत बाचाबाची केली. यामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगविले. तसेच काहींना काठीचा सौम्य प्रसादही दिला.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेला सरपंच मीराबाई आडकिणे, उपसरपंच दैवशाला पंडित, ग्रामविकास अधिकारी नंदू घळे उपस्थित होते. नियोजित वेळेप्रमाणे ग्रामसभा घेण्यात आली. सुरुवातीच्या एका तासात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु त्यानंतर मात्र विरोधकांनी मागच्या कामाचे काय झाले?, केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, असे म्हणून ग्रामसभेत गोंधळ घातला. पाहता पाहता गोंधळाने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामसभेत गोंधळ वाढल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बाळू चोपडे, जमादार सुनील रिठे, काळोजी वानोळे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.
काहींना दिला सौम्य ‘प्रसाद’
ग्रामसभेत मागील कामाच्या मुद्यांवरून दुपारी साडेबारा वाजेदरम्यान गोंधळ उडाला. यावेळी गर्दी झाल्याचे पाहून पोलिसांनी लगेच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गर्दीला पांगविले. परंतु काही जण गर्दीपासून दूर होत नव्हते. यावेळी पोलिसांनी गर्दीतून बाहेर न जाणाऱ्यांना काठीचा ‘प्रसाद’ दिला.