संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार
By विजय पाटील | Published: March 25, 2024 01:32 PM2024-03-25T13:32:02+5:302024-03-25T13:37:07+5:30
ट्रकसह संत्र्यांचेही नुकसान; २५ मार्चला सकाळी साडेसातला घडला प्रकार
विजय पाटील, हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा नजिक असलेल्या नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.
२५ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता सदर घटना घडली. वारंगा गावाकडून नांदेडकडे संत्र्यांचा ट्रक (क्र. KA51C3627) जात होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. या अपघातात चालक मुजफ्फर अहमद (वय ३५) हा जागीच ठार झाला तर आत्तार हुसेन (वय ३०) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. गंभीर जखमीला नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात भीषण असल्यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर ट्रकमध्ये असलेल्या संत्र्यांचा चुराडा झाला. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला संत्र्यांचा सडाही पडला होता. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. काही नागरिक पडलेले संत्रे उचलून नेत होते. अपघात सकाळी झाला होता. यानंतर घटनास्थळावरून काही नागरिकांनी पोलिसांना मोठा अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी पोलीस आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत तरी पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.