हिंगोली पोलिस दलातील आनंदराव मस्के यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 21:40 IST2025-01-25T21:39:49+5:302025-01-25T21:40:27+5:30
हिंगोली पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पुंजाराव मस्के हे सध्या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत आहेत.

हिंगोली पोलिस दलातील आनंदराव मस्के यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक
हिंगोली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलिस पदकांची घोषणा झाली आहे. यात हिंगोली पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव मस्के यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.या पुस्कारामुळे हिंगोली जिल्ह्याची मान उंचावली आहे.
हिंगोली पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पुंजाराव मस्के हे सध्या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत आहेत.१९९० मध्ये ते परभणी पोलिस दलात भरती झाले. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर त्यांनी हिंगोली शहर, औंढा ना., वसमत, सेनगाव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, वाचक कक्षात कर्तव्य बजावले. ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना तब्बल ३७८ रिवार्ड मिळाले आहेत. त्यांनी रेल्वे, पेट्रोल पंप, बँक दरोडा प्रकरणाच्या तपासात प्रमुख भूमिका पार पाडून आरोपींना गजाआड केले होते.
अनेक खून प्रकरणाचा उलगडा, सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या मुसक्याही आवळल्या. त्यांच्या पोलिस दलातील कार्याची दखल घेत त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच राजभवन येथे राज्यपालांच्या हस्तेही गौरविण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आनंदराव मस्के यांचे कौतूक केले आहे.