पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेत सर्व राज्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:58+5:302021-07-14T04:34:58+5:30
हिंगोली : २०२०-२१ या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेस केंद्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ...
हिंगोली : २०२०-२१ या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेस केंद्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सन २०२१-२२ या वर्षाकरिता योजनेंतर्गत १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या योजनेचा सर्वच राज्यांतील शेतकरी, उद्योजक लाभ घेऊ शकतील. ज्या उद्योजक, शेतकऱ्याचा अर्ज या योजनेत वैध ठरला आहे, अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिनेश टाकळीकर यांनी दिली.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत ४ वर्गवारीतील विविध प्रक्रिया, उत्पादन, संवर्धन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य प्रक्रिया, मांसप्रक्रिया, पशुखाद्यनिर्मिती, पशुसंवर्धन आदींचा समावेश आहे.
पशुधनासाठी शेतकरी, उद्योजकास अर्थसाहाय्य पाहिजे असल्यास शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, व्यक्तिगत संस्था, व्यक्तिगत उद्योग, लघु व मध्यम उद्योग, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या संस्थांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे अर्थसाहाय्य मंजूर करून देण्यात येईल. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रकल्प किमतीच्या ९० टक्के कर्ज प्राप्त करून दिले जाईल. तसेच यासाठी व्याजदरात ३ टक्के सवलतही दिली जाणार आहे.
कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्जाबाबत काही अडचणी असल्यास पशुवैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत चौकशी केल्यास या योजनेबाबत माहिती मिळेल, असे कळवण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
पायाभूत सुविधा विकास निधी ही योजना शेतकरी, उद्योजक, व्यक्ती व्यावसायिक, उत्पादन संस्था, खासगी संस्था यांना लाभदायक अशीच आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन अर्जही करता येईल. कोणा एखाद्या व्यक्तीस मध्यस्थी न करता कार्यालयीन वेळेत येऊन चौकशी केल्यास योग्य राहील. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
-दिनेश टाकळीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
फोटो ०२