संतापजनक! शाळेत जाताना दोघेजण काढायचे छेड; हतबल अल्पवयीन मुलीने स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:29 PM2022-05-27T19:29:54+5:302022-05-27T19:30:11+5:30
गावातील दोघे शेतात व शाळेत जात असताना मुलीचा पाठलाग करीत छेड काढत.
सेनगाव : तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ऋतुजा ज्ञानेश्वर साळवे (रा. उटी ब्रम्हचारी) असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे. उटी ब्रम्हचारी येथील अजय समाधान इंगोले व शिवाजी पांढरे हे दोघे ऋतुजा हिला त्रास देत होते. शेतात व शाळेत जात असताना तिचा पाठलाग करीत छेड काढली. या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने २५ मे रोजी सकाळी ८ वाजता उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला सुरवातीला सेनगाव येथील रूग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असताना तिचा २६ मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी ऋतुजा हिचे वडिल ज्ञानेश्वर प्रल्हाद साळवे यांच्या फिर्यादीवरून अजय समाधान इंगोले व शिवाजी पांढरे याचेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच पोक्सो ॲक्टनुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तपास करीत आहेत.