बेबनाव उघड! हिंगोलीत महायुतीत बैठक घेवून उमेदवाराला विरोध;तर आघाडीत अनेकांची गैरहजेरी
By विजय पाटील | Published: April 1, 2024 12:16 PM2024-04-01T12:16:26+5:302024-04-01T12:17:54+5:30
हिंगोली लोकसभा मतदारसंघात जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारीवर दावा केला होता.
हिंगोली : शहरात आज महायुती व महाविकास आघाडी दोन्हींच्याही बैठका झाल्या. भाजपने घेतलेल्या बैठकीत महायुतीचा उमेदवार बदण्याची मागणी करण्यात आली. तर महाविकास आघाडीत घटक पक्षांच्या नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटातीलच अनेकांनी अनुपस्थिती दर्शवत उमेदवारीवरून असलेली नाराजी स्पष्ट केली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारीवर दावा केला होता. यात महायुतीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच सुरुवातीपासून असलेला विरोध कायम ठेवला. पक्षाने ३१ मार्च रोजी अथर्व लॉन येथे घेतलेल्या बैठकीतही हाच विरोध पहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्यासाठी घोषणाबाजी केली. काही ठरावीक नावांचीही घोषणा दिली जात होती. मंचावरील नेतेमंडळींना मात्र थेट विरोध करायचा की युतीचा धर्म निभावायचा? असा प्रश्न पडल्याचे दिसत होते. जर थेट विरोध केला तर उद्या पक्षाच्या नजरेतून पडण्याच्या भीतीने अनेकांनी सावध भूमिका व्यक्त केली. एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पुन्हा परिस्थिती मांडण्यात येईल, असे नेत्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे वागू, असे सांगण्यात आले. तर कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेल तसे करावे, असा सल्लाही अप्रत्यक्षपणे दिल्याचेही चित्र दिसत होते. एवढेच काय तर भाजपचा उमेदवार शिंदे गटाकडून दिल्यास तसे लढण्याची तयारीही दाखविण्यात आली. या बैठकीला आ.तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, माजी आ. गजानन घुगे, रामदास पाटील, मिलींद यंबल, बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
दुसरीकडे ३१ मार्च रोजीच महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसच्या इच्छुकांपैकी आ. प्रज्ञा सातव, सचिन नाईक, राष्ट्रवादीचे मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यापैकी कुणीच दिसले नाही. काँग्रेसच्या एका गटाने मात्र हजेरी लावली. दुसऱ्या गटातील एक दोन चेहरे तेवढे दिसले. त्यामुळे हाही चर्चेचा विषय बनला आहे. महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून नाराजी आहे.ती सर्वच मित्रपक्षांमध्ये दिसून येत आहे. आगामी विधानसभेच्या इच्छुकांमुळे तेवढी व्यासपीठाची शोभा वाढल्याचे दिसून येत होते.