हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:42 AM2019-03-07T00:42:46+5:302019-03-07T00:43:31+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे.
हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. आगामी काळात दहा कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
हिंगोली नगरपालिका क्षेत्रात मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी धडपड केली जात आहे.पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सगळ्यांनीच यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापूर्वीही नगरपालिकेने तीन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. आता पुन्हा गुणांकनानुसार रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी ३९ व्या क्रमांकावर असलेली हिंगोली पालिका यावेळी पश्चिम झोनमध्ये १00२ शहरांशी स्पर्धा करीत २९ व्या क्रमांकावर आली आहे.
स्वच्छतेत ठेवलेल्या सातत्यामुळे तीनदा केंद्रीय पथकाने तपासणी केल्यानंतरही हे यश मिळाले आहे. शहरातील विविध भागात जवळपास ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार आता बंदच झाल्यात जमा आहेत.
तर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्यांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंड व अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीही राबविण्यात येत आहे. त्यामुळे गुणांकन सुधारले आहे. हे अभियान सुरु करताना अनेक यंत्रणांकडून सीएसआरच्या माध्यमातून गोरगरिबांना कचरा कुंड्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. भविष्यात शहराला शासनाकडून १0 कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे.
मेहनतीचे फळ
हिंगोली शहराचा चेहरा बदलत आहे. त्यासाठी सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्याचे फळ म्हणून पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहिल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.
सातत्य राखले
हिंगोली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आखले. जनतेच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न झाला. तर सातत्य राखता आल्याने हे यश मिळाल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले.
सामूहिक यश
हिंगोलीकरांनी या उपक्रमास चांगली साथ दिली. पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळाला, असे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले.