अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ रुपयांत दोन किलो डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:57 PM2018-10-18T23:57:58+5:302018-10-18T23:58:21+5:30
राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच धान्य लंपास होण्याचे प्रकार घडत असताना रास्त भाव दुकानदारांना ही आणखी एक पर्वणी लाभली आहे.
बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणाची प्रणाली सुरू झाली असली तरीही मागील काही दिवसांपासून रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याची प्रकरणे अधिक प्रमाणात उघडकीस येत आहेत. नांदेडच्या प्रकरणानंतर हिंगोली जिल्ह्यातही पोलिसांनी तीन ते चार धाडींत असा माल जप्त केला होता. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांवरच संशयाची सूई फिरू लागली आहे. चौकशांचा ससेमीरा मागे असतानाही यात कोणतीच कमी दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात ऐन सणासुदीत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.
आता नव्याने ३५ रुपयांत चणा व उडीद डाळ प्रत्येकी एक किलो लाभार्थ्यांना वितरित करण्याचा केंद्राचा आदेश आहे. ही डाळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या दोन्हींचा अधिक असलेला बाजारभाव लक्षात घेता काळ्या बाजाराला वाव आहे. बायोमेट्रिकवरही मात केली जातेय, हे तर जवळपास स्पष्टच आहे.