कुटुंब पालन पोषण करेना, पेन्शनही मुलगाच घेतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:37+5:302021-06-26T04:21:37+5:30
हिंगोली : कुटुंबीय पालन पोषण करीत नाहीत, मागील अकरा महिन्यांपासून मुलगाच पेन्शन काढून घेतो, आता मी जगायचे कसे? अशी ...
हिंगोली : कुटुंबीय पालन पोषण करीत नाहीत, मागील अकरा महिन्यांपासून मुलगाच पेन्शन काढून घेतो, आता मी जगायचे कसे? अशी कैफियत घेऊन थेट रुग्णालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या माजी सैनिक दलितकुमार नाथा तपासे यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तपासे जिल्हा कचेरीत थेट रुग्णालयातून आल्याच्या स्थितीत दाखल झाले. अंगावर टॉवेल घेऊन मूत्रसंचयाची बॅग एकाच्या हाती घेऊन आलेल्या तपासे यांना पाहून गंभीर रुग्ण समजून अनेकजण त्यांच्यापासून दूर जाताना दिसत होते. तरीही प्रशासनाने मात्र त्यांची कैफियत ऐकून घेतली.
तपासे यांचा अकरा महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक क्षतीला सामोरे जावे लागले. पूर्वी त्यांचे पायही काम करीत नव्हते. कंबरेतून खालच्या भागात त्राणच नसल्याने जागचे हलता येत नसल्याने आतापर्यंत खाटेवरच पडून होतो, असे त्यांनी सांगितले. आता पाय बऱ्यापैकी काम करीत असले तरीही हात अजिबात हलत नाहीत. त्यांचे तळहात आणि बोटेही सुजलेली होती. धापा टाकतच ते आपली कैफियत मांडत होते. सुरुवातीला कुटुंबियांनी काळजी घेतली. आता तेही माझी काळजी घेत नाहीत. शिवाय माझा एक मुलगाच माझी पेन्शन उचलतो. बँकेत गेल्यावर ही बाब कळाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे माझ्या कुटुंबियांना माझी पेन्शन देऊ नये, अशी मागणी केली. त्यांना तसे लेखी देण्यास सांगितले, तर हातांची परिस्थिती दाखवत असमर्थता दर्शविली. तेव्हा तेथून फोन लावून दिल्यास बँक व्यवस्थापकाशी बोलू, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर तपासे यांनी माजी सैनिक कल्याण विभागातही जाऊन आपली कैफियत मांडली.