४०० आदिवासींनी जमीन वारशासाठी केले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:29 AM2018-12-07T00:29:09+5:302018-12-07T00:31:33+5:30
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा फेरफारासाठी अर्ज दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा फेरफारासाठी अर्ज दाखल केले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराजस्व अभियान कळमनुरी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आले. या अभियानात नायब तहसीलदार पाठक, मंडळ अधिकारी सावंत व महसूलच्या पथकाने सर्व तयारी केली. या अभियानास कळमनुरी आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डा. सतीश पाचपुते, सरपंच खंदारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तलाठी पाईकराव, माखणे, साधू, इंगळे यांच्यासह महसूलचे मोठे पथक येथे हजर होते. अनुसूचित क्षेत्रातील खातेदारांच्या खातेफोड, विभागणी, वारसा फेरफार जागेवर करण्यासाठी हे कार्यशाळा राबवण्यात आली. आदिवासी बांधवांच्या वतीने काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या जमिनी नावावर करून मिळणेबाबत, त्यांचे फेर करण्याबाबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोचार्ची दखल घेऊन तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अभियानाचे आयोजन केले होते.
या अभियानात काळ्याचीवाडी, बहुर, भुरक्याची वाडी, कांडलीसह परिसरातील पंधरा गावातील आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. या कार्यशाळेत मंडळाधिकारी सावंत यांनी मार्गदर्शन केले. तर तलाठी इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. वेगवेगळ्या टेबलवर दिवसभर चारशे आदिवासी बांधवांनी अर्ज दाखल केले आहेत.