कृषी औजारे, सिंचन सुविधांसाठी पोर्टलवर अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:37+5:302021-08-27T04:32:37+5:30
हिंगोली : प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, ...
हिंगोली : प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा या बाबींसाठी २०२१-२२ करीता इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहायकांशी संपर्क करून १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी यासाठी नोंदणी करावी. संबंधित शेतकऱ्यांनी ३० ऑगस्ट, १० सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करून घ्यावी.
जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास २५ रुपये प्रती किलो, १० वर्षांवरील वाणास १२ रुपये प्रती किलो, संकरित मका ९५ रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ३० रुपये प्रती किलो, १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रती किलो, करडई बियाण्यासाठी ४० रुपये प्रती किलो, गहू बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास २० रुपये प्रती किलो, १० वर्षांवरील वाणास १० रुपये प्रती किलो प्रमाणे बियाणे वितरण करण्यात येणार आहे. एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय राहणार आहे.
शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी केले आहे.