अर्ज करण्यासाठी उद्याची ‘डेडलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:53 PM2018-06-02T23:53:41+5:302018-06-02T23:53:41+5:30
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.
यापूर्वी जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांना आता संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांचे आॅनलाईन अर्ज भरताना शासनाने दिलेल्या अटींचे पालन करावे, तसेच रहिवासी पुराव्यानुसार गुगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅपिंग करून घ्यावे. विशेष म्हणजे अर्जात भरलेल्या माहितीची पालकांनी खात्री करावी. प्रवेश निश्चित करताना शाळेत सर्व मूळ प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, सर्व शिक्षाचे प्रशांत भगत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली आहे. २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून ११३१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात एकूण २४५ विद्यार्थ्यांची आॅनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली. त्यापैकी १५० विद्यार्थ्यांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
दुर्बल घटकांतील बालकांनाही मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागेत प्रवेश मिळावा यासाठी शासनाकडून अर्ज प्रक्रियेची तारीख वाढविण्यात आली. आहे. ४ जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
प्रवेश निश्चित झालेल्या खासगी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, अशा पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.