घरातला वाद डोक्यात ठेवला; दिराने शेतात भावजयीवर कुऱ्हाडीने वार केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 08:08 PM2020-07-23T20:08:54+5:302020-07-23T20:10:17+5:30
हिंगोली जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दिराने केला भावजयीचा खून
बासंबा (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे किरकोळ कौटुंबिक वादाचा राग मनात धरून दिराने डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत सविता संजय जाधव (२८) या आपल्या भावजयीचा खून केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
जोडतळा येथील सविता जाधव या गावातील एकाच्या शेतात निंदण काम करण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी महिलेसोबत शेतात जेवण करत असताना रामेश्वर जाधव (२५) हा तेथे आला. त्याने कोणाहीशीही न बोलता थेट भावजय सविता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे तीन ते चार प्रहार केले़ यादरम्यान बाजूला असलेल्या महिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडा केला़ मात्र, रामेश्वर सोडविणाऱ्यांच्या अंगावरही कुºहाड घेऊन धावत होता. सविता निपचित पडल्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला़
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. या घटनेमागे घरगुती वादाचे कारण असल्याचे समोर येत आहे. सकाळी झालेला वाद डोक्यात ठेवून रामेश्वरने हे कृत्य केले. पैशावरुन हा वाद झाला असल्याचे सांगितले जाते.
मयताच्या मुलींचा हृदयद्रावक आक्रोश
मयत सविता यांना चार अपत्ये आहेत. यात तीन मुली व एक मुलगा आहे. सविता यांच्या प्रेताच्या शेजारी बसून असलेल्या त्यांच्या दोन मुली अंजली व जान्हवीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, तर एक वर्षाचा मुलगाही आईला उठविण्याचा प्रयत्न करीत होता. तिसरी कार्तिकी नावाचीही मुलगी आहे. बाजूलाच शिदोरी सोडलेली दिसत होती, तर झटापटीत भाजी सांडल्याचे दिसत होते.
दिराचा आत्महत्येचा प्रयत्न
या घटनेनंतर रामेश्वर जाधव याने विषारी द्रव प्राशन केले़ यानंतर त्याच्या सासऱ्याने त्याला सिरसम येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. मात्र तो तेथूनही पसार झाला आहे. रामेश्वरला मिरगीचा आजार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.