मुलीचा खून करणा-या पित्यास अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:24 AM2018-01-21T00:24:35+5:302018-01-21T00:25:58+5:30
चारित्र्यावर संशय घेवून लोखंडी रॉड डोक्यात मारून पोटच्या मुलीचा खून करणा-या क्रूरकर्मा पित्यास अखेर पोलिसांनी सव्वा महिन्यानंतर अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : चारित्र्यावर संशय घेवून लोखंडी रॉड डोक्यात मारून पोटच्या मुलीचा खून करणा-या क्रूरकर्मा पित्यास अखेर पोलिसांनी सव्वा महिन्यानंतर अटक केली आहे.
आखाडा बाळापूर येथील एरिगेशन कॅम्पजवळ राहणाºया चंद्रमुनी वाठोरे याने ४ डिसेंबर २०१७ रोजी राहत्या घरी २० वर्षीय मुलीस व पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्यात रॉड लागून गंभीर जखमी मुलीचा ७ डिसेंबर २०१७ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी सुनीता यांच्या तक्रारीवरून पिता चंद्रमुनी वाठोरेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी बाळापूर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. डीवायएसपी शशिकिरण काशिद यांनी आरोपीस पकडण्यासाठी तीन पथके नेमली होती. पथकांनी माहूर, निजामाबाद, नांदेड, औरंगाबादसह विविध ठिकाणी शोध घेतला. पण आरोपी काही हाती लागला नाही.
अखेर कळमनुरी ठाण्याचे ठाणेदार जी.एस. राहिरे यांनी आरोपीस २० जानेवारी रोजी सकाळी वाकोडी शिवारातून अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करून तपासिक अंमलदार फौजदार सदानंद मेंडके, पोकॉ शेळके, पोना अर्शद पठाण, पोकॉ पवार, चालक यांच्या ताब्यात दिले. सव्वा महिन्यानंतर आरोपी सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.