जनतेचे प्रश्न मांडा, ईडीचे काय वाकडे होणार? शिवसेनेच्या माजी खासदाराची स्वपक्षीय नेत्यावरच टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 02:30 PM2022-02-21T14:30:45+5:302022-02-21T14:35:32+5:30
उगाच शिळ्या कढीला ऊत कशाला; राणे-राऊत वादात शिवसेनेचे माझी खासदार शिवाजी माने यांची उडी
हिंगोली : मागील काही दिवसांपासून भाजप व सेनेतील नेत्यांनी एकमेकांवर घाेटाळेबाजीचे सुरू केलेले आरोप राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे व सेनेचे खा. संजय राऊत यांच्या वादावर सेनेचे माजी खा.शिवाजी माने यांनी फेसबूक पोस्ट टाकून टीकेची राळ उडविली. सध्या शिवसेनेत असलेल्या माने यांनी दिलेला घरचा आहेर चर्चेचा विषय बनला आहे.
माने यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, ईडीचा घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत,लोकसभेतही जनतेचे प्रश्न मांडा. ईडीच काय वाकड होणार हेही आम्हाला माहीत आहे. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे काय झाले? ते आत्ताच होणार आहे. ही नवीन समाजकारणाची पद्धत पहावयास मिळते आहे. ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणू शकतो. बरे आम्ही कुणाशी भांडत आहोत? असा सवाल करीत कंसात आपल्यांशीच न.. असे म्हटल्याने सेना व भाजपचे वैर त्यांना अपेक्षित नसल्याचे दिसते. तर कॅाग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाबाहेरून मजा घेत आहे. अजित पवार वगळता या विषयावर कुणी भाष्य केलयं हे एकवित किंवा वाचण्यात नाही, असे पुढचे वाक्य असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे वाटणाऱ्यांपैकी माने असावेत, असे यावरून वाटत आहे.
तर त्यांनी पुढे लिहिले की, गोर - गरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीच पाडापाडी करत आहोत. अशाने काय साध्य होणार आहे? संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुणी किती कष्टाने कमाई केली.संजय राऊत कोण होते, त्यांचा पगार किती होता? किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते ? बरे राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेत. त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले होते, त्यावेळी ते काय धुतल्या तांदळासारखे होते काय? मुबंईत शिवसेना वाढविणाऱ्या मंडळींत राणेही होते. उगाच शिळ्या कढील उत का आणता मग काॅ. दत्ता सामंतांपासूनच्या हत्येचा शोध घेत बसा कोण कोण गुन्हेगार आहे ते सर्व बाहेर येईल. शेवटी तुम्ही आम्ही सर्वच जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोत. एक गोष्ट विसरू नका मुबंईला वाचविणारी मंडळीच आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीच वाट काँग्रेस पहात आहे. माने यांच्या या पोस्टमुळे हा कलह थांबणार नाही, हे खरे. मात्र त्यांनी भाजपकडे कल दाखविल्याची चर्चा आहे