अभियंत्याचा ऐन मीटिंगमध्ये मृत्यू; वरिष्ठांनी ‘व्हीसी’मध्ये धमकी दिल्याचा नातेवाइकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:10 PM2024-10-02T16:10:14+5:302024-10-02T16:11:22+5:30
हिंगोलीच्या महावितरण कार्यालयातील धक्कादायक प्रकार
हिंगोली : येथील महावितरण कार्यालयात सचिन दत्तात्रय कोळपे (वय ३८, रा. नांदेड) या सहायक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १) दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. ‘व्हीसी’ दरम्यान मुख्य अभियंत्याने कामासंदर्भातील आढावा घेताना धमकी दिल्यामुळे ताण आल्याने कोळपे यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला.
महावितरणच्या नांदेड विभागांतर्गत नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी नांदेड येथील मुख्य अभियंत्याकडून व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात येत होती. यादरम्यान तीनही जिल्ह्यातील महावितरणच्या अभियंत्यांना सूचना दिल्या जात होत्या. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयात ग्रामीण विभाग-१चे सहायक अभियंता सचिन कोळपे अचानक खुर्चीवरून खाली कोसळले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. त्यानंतर कोळपे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. कोळपे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला.
‘...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’
सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मयत कोळपे यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. कोळपे यांचा मृत्यू कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या धमक्यांमुळे झाल्याचा आरोप करीत जोपर्यंत नांदेड विभागाचे मुख्य अभियंता, हिंगोलीचे अधीक्षक अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती आहे.