रोहीच्या धडकेत जखमी सहाय्यक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:50 PM2021-07-08T12:50:36+5:302021-07-08T12:55:01+5:30
Assistant police inspector dies in Accident : कळमनुरी शहराजवळ रोही प्राण्याने दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होते
सेनगाव ( हिंगोली ) : रोही प्राण्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कान्होजी मुकाडे (वय ५२ रा. जांब, ता. कळमनुरी) यांचा उपचारादरम्यान नांदेड येथे ७ जुलै रोजी मृत्यू झाला. ते सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कान्होजी रामचंद्र मुकाडे हे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी कळमनुरी शहराजवळ आली असताना अचानक रोही प्राण्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुकाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात हलवले होते.
हिंगोलीत उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तब्येत चांगल्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टीही दिली जाणार होती. मात्र ७ जुलै रोजी रात्री अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मूळचे रहिवाशी असलेले कान्होजी मुकाडे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा या पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले. जिल्ह्यात त्यांनी हिंगोली, कळमनुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या ते सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
...........