जिल्हाप्रमुखावर अॅट्रॉसिटी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:08 PM2018-12-04T23:08:43+5:302018-12-04T23:09:06+5:30
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर कळमनुरीचे काँग्रेसचे आ. डॉ.संतोष टारफे यांनी औंढा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर कळमनुरीचे काँग्रेसचे आ. डॉ.संतोष टारफे यांनी औंढा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान औंढा तहसीलच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ध्वनीक्षेपकावर दोन ते अडीच हजार लोकांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन फिर्यादीचा अवमान केल्याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली.
सदरील घटना २९ रोजी घडलेली असली तरी आ. संतोष टारफे यांनी ४ डिसेंबर रोजी अखेर गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक सिध्देश्वर भोरे हे करणार आहेत.
दरम्यान, कालपासून या घटनेबाबत चर्चा होती. काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले होते. आज पुन्हा आ.टारफे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर औंढा पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केल्यानंतर शिवसेनेनेही कळमनुरी व औंढ्यात बंदचे आवाहन केले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याने खेदाने अॅट्रॉसिटी दाखल करावी लागली. आम्ही या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास विरोध करतो. मात्र जात माहिती असूनही असा अवमान केल्याने कायदेशिर सल्ला घेतल्यानंतरच गुन्हा दाखल केला. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा होता. माझ्या मतदारसंघातील चार सर्कल दुष्काळग्रस्तांच्या यादीत नाहीत. त्यासाठी मी निवेदनेही दिली. तरीही अशाप्रकारची टीका केल्याने समर्थकांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असे आ.टारफे म्हणाले.
संतोष बांगर यांना अटक व्हावी, स्थगिती दिलेली तडिपारी पुन्हा नियमित करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सर्वसमावेशक निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.