फुटाण्यात पुन्हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:41 AM2021-02-27T04:41:07+5:302021-02-27T04:41:07+5:30
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा हे गाव गेल्या महिन्यापासून चर्चेत आले आहे. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरुन दोन समाजात तेढ निर्माण ...
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा हे गाव गेल्या महिन्यापासून चर्चेत आले आहे. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. यापूर्वी तीन ते चार मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातून ॲट्राॅसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर ठाण्याचे ठाणेदार व कळमनुरी तहसीलदारांनी संयुक्त बैठक घेवून फुटाणा गावातील नागरिकांनी वाद मिटविण्याचे आवाहन केले होते. वाद मिटवून सार्वजनिक विहिरीचे पाणी सर्वांसाठी खुले केले असल्याचे पोलीस व तहसीलदारांनी कळविले. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या समुपदेशनानंतर गाव शांत होईल असे वाटले होते. परंतु, १५ दिवसानंतर शुक्रवारी पुन्हा वाद झाला. फुटाणा येथील वैभव शिवाजी नरवाडे यांनी बाळापूर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादी हा मागासवर्गीय जातीचा असल्याचे माहीत असूनही काही जणांनी संगनमत करुन फिर्यादीस सार्वजनिक विहिरीचे पाणी व मागील वादाच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ केली. त्याच्या शेतातील गोठा शेड तसेच शेती अवजारे जाळून नुकसान केल्याचा संशय आहे. वैभव नरवाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव ऊर्फ महेश दत्तराव कदम, गजानन धोंडिबा पवार, गंगाधर धोंडिबा पवार (रा. फुटाणा) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख हे करीत आहेत.