गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:55 PM2021-08-21T16:55:51+5:302021-08-21T16:56:44+5:30
शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता.
वसमत ( हिंगोली ) : शहरातील मोंढा भागात चार दिवसापूर्वीच गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा गुटख्याचा एक कंटेनर वसमत पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. कंटेनरमधून ५० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. चार दिवसांतील दोन मोठ्या कारवायांमुळे वसमत येथे गुटख्याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
वसमत शहर गुटक्याचे माहेरघर झाले आहे. शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता. यात प्रतिष्ठित व्यापारी म्हणून वावरणाराच आरोपी निघाला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आज गुटख्याने भरलेला कंटेनर वसमतमध्ये दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
हेही वाचा - चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या
माहितीवरून पोलिसांनी शिराज कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या कंटेनरची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये गुटख्याच्या ५० पिशव्या आढळून आल्या. चालकाची कसून चौकशी केली असता बेंगलोर येथून हा गुटखा वसमत येथे आल्याचे पुढे आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक बी एस खारडे, पोलीस नाईक भगीरथ सवंडकर, बालाजी जोगदंड, दिलीप पोले आदी कर्मचाऱ्याच्या पथकाने केली.
विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी कारवाई झालेल्या मोंढा भागापासून जवळच असलेल्या वस्तीत हा कंटेनर उभा होता. त्यामुळे पहिल्याच आरोपीचा या कंटेनरसोबतही संबंध असल्याची शक्यता आहे. यावरून शहरातील गुटखा रॅकेट किती मुजोर झाले आहे याचा प्रत्यय येत आहे.