वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:35 AM2024-11-19T11:35:23+5:302024-11-19T11:37:15+5:30
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे कारने हातमालीवरून हिंगोलीकडे जात असताना सेलसुरा फाट्यावर आरोपींनी त्यांची कार आडवी लावली.
हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. या हल्ल्यात डॉ.मस्के जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे कारने जात असताना सेलसुरा फाट्यावर त्यांच्या कारवर दगडफेक झाली. डॉ.मस्के यांना मारहाणही करण्यात आली आहे. या हल्ल्यात डॉ.मस्के हे जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली येथे प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे त्यांना हलविले आहे.
याप्रकरणी अफताप रहीमखा पठाण यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रार म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे कारने हातमालीवरून हिंगोलीकडे जात असताना सेलसुरा फाट्यावर आरोपींनी त्यांची कार आडवी लावली. कारमधील पाच लोकांनी तोंडाला रुमाल बांधून मस्के यांच्या कारवर दगडफेक केली. कारच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच डॉ.मस्के यांना दगडाने व बुक्क्यांनी मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत. या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.